पुणे – सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण लॉकडाऊन असतानाही संचेतीच्या चौकात सकाळी दहा वाजल्यापासून अक्षरश: तोबा गर्दी झाली. यामध्ये चारचाकी, दुचाकी गाड्यांवर नागरिक फिरत होते. त्यांना फिरण्यासाठी मज्जाव करताना त्या 11 जणांना पाहून पोलीसांना धक्काच बसला. कारण त्यांच्या हातावर “होम क्वारंटाइन’चा शिक्का मारला होता. हे सर्व नागरिक परप्रांतीय होते.
शहरातील काही भागांमध्ये लॉकडाऊनचा पुरता फज्जा उडाला होता. त्यातून संचेती चौकात तर लॉकडाऊनचा लवलेशही नव्हता. सकाळपासून या पुलावर चारचाकी आणि दुचाकीस्वार स्वैरपणे हिंडत होते. पोलीसांनी त्या चौकात नागरिकांना फिरण्याला मज्जाव करण्याला सुरूवात केली. ज्यांच्याकडे पास आहे त्यांना जाऊ दिले जात होते, ज्यांच्याकडे नाही त्यांना घरचा रस्ता दाखवला जात होता. ती तपासणी करत असतानाच पोलीसांना तब्बल 11 जणांच्या हातावर “होम क्वारंटाइन’चा शिक्का होता.
तो शिक्का पाहून पोलीस अक्षरश: चक्रावले. त्या 11 जणांना बाजूला बसवण्यात आले. त्यांच्यावर जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली. त्यांना बाहेर का पडले याची माहिती घेण्यात आली. याशिवाय संचेतीच्या चौकातही जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली.
हे सगळे एकसाथ बाहेर पडणे म्हणजे अक्षरश: करोना प्रसाराचे बॉम्बच ठरले. पोलीसांनी तपासणी केली तेव्हा हे दिसून आले, परंतु लॉकडाऊन जेव्हा शिथील झाले, तेव्हा असे “होम क्वारंटाइन’चे शिक्के मारूनही किती मानवी करोना बॉम्ब फिरत होते, देव जाणे.