महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : निष्काळजीपणा बेततोय नागरिकांच्या जिवावर
पिंपरी – करोना रुग्णांच्या उपचारादरम्यान डॉक्टरांनी वापरलेले पीपीई किट रस्त्यावर फेकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी येथील भाटनगर लिंकरोड येथील सर्वधर्मीय स्मशाऩभूमीमध्ये करोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. येथे स्मशानभूमीच्या बाहेरच वापरलेल्या पीपीई किट आढळून आल्या आहेत. त्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. तसेच यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला करोनाबाबात गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे.
शहरामध्ये करोनाचा विळखा घट्ट झाला आहे. शहरातील सर्वच भागात करोनाचे रुग्ण आढळत आहेत. तसेच मृतांची संख्याही वाढली आहे. करोनाबाधित मृतदेहांवर पिंपरीतील भाटनगर येथील सर्वधर्मीय स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. महापालिकेचे कर्मचारी रुग्णालयातून मृतदेह घेऊन येतात. यावेळी त्यांच्या अंगावर पीपीई किट असते. या पीपीई किटचा वापर रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार करत असताना डॉक्टर करतात.
तसेच करोनाबाधित रुग्णाचा मृतदेह हातळणारे कर्मचारी संरक्षणासाठी पीपीई किट परिधान करतात. त्यामुळे व्यक्तीच्या शरीराशी कोणत्याही विषाणूचा थेट संबंध येत नाही. करोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट पुरविल्या जात आहेत. याच पीपीई किट भाटनगरमध्ये रस्त्यावर सापडल्याने खळबळ उडाली आहे.
भाटनगर परिसर हा झोपडपट्टीचा भाग आहे. येथे थाट लोकवस्ती आहे. अशाप्रकारे पीपीई किट रस्त्यावर टाकल्याने स्थानिक नागरिकांना संक्रमण होण्याचा धोका वाढला आहे. पालिकेचे कर्मचारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर मास्क, पीपीई किट रस्त्यावर आणून टाकत आहेत. याकडे महापालिकेच्या वैद्यकिय व आरोग्य या दोन्ही विभागाने दुर्लक्ष केले आहे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्याही जीवाला यामुळे धोका असल्याने तेही या पीपीई किट उचलत नाहीत. या परिसरात भटक्या जनावरांची संख्या अधिक आहे.
एखादे जनावर ही किट तोंडात उचलून फिरले तरी मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता आहे.
पीपीई किट कोणी टाकले आहेत, याबाबत चौकशी केली जाईल. मी कर्मचाऱ्यांना सांगून त्या किट काढायला सांगतो. त्याची पोलीस चौकशी केली जाईल. त्यानंतर दोषीवर कारवाई केली जाईल.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी
भाटनगरमध्ये पीपीई किट रस्त्यावर टाकले आहेत. त्यामुळे इतर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाटनगर हा झोपटपट्टीचा भाग आहे. येथे करोनाचा फैलाव झाला तर आटोक्यात आणणे कठीण होईल. त्यामुळे अशाप्रकारे हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कारवाई करावी.
– विशाल कसबे, उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर युवक कॉंग्रेस.