विडणी – तरडगाव, ता. फलटण येथील डॉक्टर महिला करोनाबाधित झाल्यानंतर तिच्या वडिलांच्या संपर्कात आलेल्या विडणीतील 15 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.तरडगाव येथील एका व्यक्तीचे बुधवारी (दि. 15) निधन झाल्याचे समजल्याने त्या व्यक्तीचे विडणी येथील नातेवाइकांसह 15 जण अंत्यविधीसाठी तरडगावला गेले होते. त्यावेळी अंत्यविधीसाठी क धित डॉक्टर महिलेचे वडीलही उपस्थित होते. त्यांच्या संपर्कात अनेक जण आले.
त्यामध्ये विडणीतील 15 जणांचा समावेश असल्याचे समजताच ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन समिती व विडणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी या सर्व व्यक्तींच्या हातांवर होम क्वारंटाइनचे शिक्के मारून त्यांना त्यांच्या घरी कोणाच्याही संपर्कात न येता राहायला सांगितले आहे. त्यांच्यापैकही कोणलाही कोणत्याही प्रकारची सर्दी, ताप, खोकला झाल्यास त्यांनी ताबडतोब तपासणी करून घ्यावी, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
विडणी हे गाव मोठ्या लोकसंख्येचे असून गावात करोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून ग्रामस्थ काळजी घेत आहेत. सरपंच, पोलीस पाटील, आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविका व ग्रामपंचायत कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. सोशल मीडियाद्वारे व ध्वनिक्षेपकावरून अनेकदा संदेश देऊन जागृती केली जात आहे. घरी रहा, सुरक्षित रहा, हा संदेश प्रसारित केला जात आहे.