अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांचे आदेश
पुणे – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित करण्यासाठी महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांत त्वरित रिस्पॉन्स टीम तयार करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले.
महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयस्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये परिसरातील संशयित रुग्ण, लक्षणे असलेले रुग्ण, विविध विलगीकरण कक्षात दाखल केलेले रुग्ण स्थितीचा आढावा घेऊन कारवाई करणे, रुग्णांचे लाळेचे नमुने घेतल्यानंतर आलेल्या अहवालानंतर करण्यात येणारे नियोजन, रुग्णांची परिस्थिती, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा पाठपुरावा, रुग्णालयात अत्यवस्थ रुग्ण, मयत रुग्ण, मयत व्यक्तीचे नातेवाईकांना सहकार्य, अंत्यविधी करता वाहतूक नियोजन, अशा कामांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय त्वरित रिस्पॉन्स टीम आवश्यक असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
ससून हॉस्पिटल येथे रुग्ण दाखल झाल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयस्तरावरील माहिती लवकर प्राप्त न झाल्यामुळे कामात अडचणी येत आहेत. त्यामुळे सदर माहिती लवकर प्राप्त होण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, आशा सूचना अग्रवाल यांनी केल्या. याशिवाय, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला दोन ऍम्ब्युलन्स दिल्या असून, 108 नंबरच्या ऍम्ब्युलन्स यायला उशीर होत आहे. तसे होऊ नये यासाठी याचा समन्वय ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या निकषानुसार डेडबॉडी मॅनेजमेंट समन्वय ठेवून महापालिका अधिकारी श्रीनिवास कंदूल, डॉ. कल्पना बळीवंत यांच्याशी समन्वय साधून सरकारी नियमानुसार दहन/दफन करण्यात यावे, अशा सूचनाही अग्रवाल यांनी केल्या.