राजगुरूनगर -भोसरी येथील करोनाबाधित अंडी विक्रेत्याच्या संपर्कात आलेल्या मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, कडाचीवाडी, खराबवाडी व कुरूळी गावातील 345 अंडी व किराणा विक्रेत्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 1062 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. चाकण शहरात खबरदारी म्हणून सर्व लॉज मिळून 100 बेड उपलब्ध केले जाणार आहेत. त्या संदर्भांत लॉज चालकांची बैठक बोलाविण्यात आली आहे.
कदाचित करोना पॉझिटिव्ह आढळ्यास त्याची सोय महाळुंगे येथे म्हाडाच्या इमारतीमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी चाकण, राजगुरूनगर शहरातील खासगी डॉक्टरची मदत घेतली जाणार आहे. आतापर्यंत 419 डॉक्टरांची यादी तयार केली असून त्यातील 186 डॉक्टरांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे, अशी माहिती खेडचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) संजय तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आणि आपल्या राज्यातील कामगार आहेत. लॉकडाऊन झाल्याने त्यांना जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानिक आणि काही सेवाभावी संस्थानी पुढाकार घेऊन आतापर्यंत त्यांच्या जेवणाचा प्रश्न सोडवला आहे; मात्र आता दि. 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. सध्या तालुक्यात कोणीही करोना बाधित नाही तरीही भविष्यात हे संकट उभे राहिले तर प्रशासनाकडून सर्व ती खबरदारी घेणयात आली आहे.
आतापर्यंत गरजू गरीब व कामगारांना गहू, तांदूळ देण्याच्या व्यवस्था करण्यात आली होती. यापुढे त्यांना भोजन किट देण्याची योजना प्रशासनाने केली आहे. कम्युनिटी किचनसाठी गहू तांदूळ खरेदीसाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे मागणी नोंदवली आहे. सध्या 10 लाख रुपये निधी खर्च करण्यात येत असून त्यातून 1570 किलो गहू व 3000 किलो तांदूळ खरेदी करून कम्युनिटी किचनची तयारी सुरू आहे.
“तुम्हीच तुमचे रक्षक बना’
खेड तालुक्यात गटविकास अधिकारी मुख्याधिकाऱ्यांना आगामी काळात करोना विषाणूचा उद्रेक तालुक्यात झाला तर यंत्रणा कशी लावायची याचे प्लॅनिंग केले आहे. सिम्टन्स सर्वेक्षणासाठी 70 टीम तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वयंसेवक व झोनल अधिकाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एकूणच आगामी काळातील करोनाचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे. करोनामुक्त तालुका ठेवण्यासाठी प्रशासनाची कडक भूमिका आहे, त्याला नागरिकांनी सहकार्य करावे. लॉकडाऊनच्या काळात घरात थांबावे सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहेत. तुम्हीच तुमचे रक्षक बना असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.
कामगारांची केली व्यवस्था
खेड तालुक्यात लॉकडाऊनसुरु झाल्यानंतर विशेषतः चाकण परिसरातील गावांमध्ये बैठक घेण्यात आल्या त्यात करोना विषाणू प्रादुर्भाव व घ्यावयाची खबरदारी याबाबत या भागातील गावामधील ग्रामस्थांशी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे. खेड तालुक्यात लॉकडाऊननंतर 69 हजार कामगार परराज्यातील आहेत तर आपल्या राज्यातील 39 हजार 200 कामगार असे जवळपास 1 लाख कामगार आजही चाकणमध्ये आहेत. 43 हजार कामगारांची येथील एमआयडीसीतील कंपन्याकडून व्यवस्था करण्यात आली आहेत तर 28 हजार 550 कामगारांना सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून व्यवस्था केली जात आहे.
2 लाख 77 व्यक्तींना रेशन
खेड तालुक्यात 188 रेशनिंग दुकाने आहेत. त्यामाध्यमातून 51हजार 500 कुटुंबातील 2 लाख 77 व्यक्तींना रेशनिंग दिले जात आहे. ते नियमीत सुरू आहेत. तालुक्यात 2755 अंत्योदयमध्ये रेशन कार्ड असून 14 हजार लोकसंख्याला असे दोन्ही मिळून तालुक्यात 2 लाख 91 हजार व्यक्तींना रेशनिंगचे धान्य वाटप केले जात आहे. उर्वरित केशरी कार्ड असेलेल्या तालुक्यातील 19400 कुटुंबातील 1 लाख 06 हजार व्यक्तींना दि. 1 मे रोजी धान्य वाटप केले जाणार आहे.
खराबवाडीत “होम टू होम’ सर्वेक्षण
आंबेठाण – खराबवाडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांचे होम टू होम सर्वेक्षण सुरू करण्यात आले यासाठी 70 जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक “होम टू होम’ जात नागरिकांची चौफेर माहिती घेणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने घरात कोण कोण राहतात, एका कुटुंबात किती सदस्य आहेत. सर्दी, खोकला, ताप, करोना विषाणू बाबतची लक्षणे, मधुमेह, उच्च रक्तदाब, डायलिसिस रुग्ण यासारख्या अन्य आजार असलेल्या नागरिकांचे संपर्क क्रमांक, सध्याचा व मुळचा पत्ता लिहून घेतला जात आहे.
खेड तालुक्यात करोना विषाणूचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 50 लाखांची मदत मिळाली असून त्यातून तालुक्यात 15 ते 20 कम्युनिटी किचन लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
– संजय तेली, उपविभागीय अधिकारी