पुणे – बै. जी. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.16) रात्री उशिराने याबाबतचा आदेश आला असून अचानक झालेल्या या बदलीमुळे उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाबरोबरच मुंबईत वैद्यकीय शिक्षण सहसंचालक या पदाचा अतिरिक्त पदभार होता. त्याच पदावर त्यांची बदली करण्यात आल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. तर, त्यांच्या जागी सह अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. करोना विषाणूने पुणे शहरास राज्यात थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी आणि रुग्णांना उपचार देण्यासाठी डॉ. अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स नायडू रुग्णालयातील बाधित रुग्णांना उपचार देत आहेत. रुग्णाला तत्काळ उपचार मिळावे, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सूसनच्या नवीन अकरा मजली इमारतमधील अतिदक्षता विभाग कमी वेळात सज्ज करण्यात डॉ. चंदनवाले यांचा मोलाचा वाटा आहे.
मात्र, आतापर्यंत पुण्यात करोनाने मृत्यू झालेल्या एकूण संख्येत ससून रुग्णालयातील मृतांची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत त्यांची गुरुवारी अचानक बदली झाली. त्यामुळे नक्की बदलीमागाचे कारण काय, यातपण राजकारण नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.