पिंपरी – कारचालकाने बोनेटवर फरफट नेल्यानंतरही मोटार न सोडणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचारी आबा सावंत यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिवाची बाजी लावून कर्तव्य निभावणाऱ्या आबा सावंत याच्या सारख्या वाहतूक पोलिसांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई येथे काढले.
पिंपरी चिंचवड येथे मास्क न घातल्याने एका कार चालकाविरुद्ध कारवाई करीत असताना वाहतूक पोलीस आबा सावंत यांना त्या कार चालकाने बोनेटवर लटकून फरफटत नेले होते.
त्यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या “ज्ञानेश्वरी’ या शासकीय निवासस्थानी करण्यात आला.
यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश तसेच सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले उपस्थित होते. आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आबा सावंत यांना 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिल्याचेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.