मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांच्याकडील गृहखातं जाणार किंवा मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र अनिल देशमुख सेफ राहिले आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली. बदलीमुळं नाराज झालेल्या परमबीर सिंग यांनी आज खळबळजनक आरोप केले आहे.
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये वसूल करण्यास सांगितले होते असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. टाईम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये जमा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक आढळल्यापासून राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यातच वाझे यांच्या चौकशीमुळे सरकार अडचणीत आलं असताना परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडली आहे.