Anil deshmukh on Fadanvis – चांदीवाल आयोगाने दिलेल्या अहवालात आपल्याला क्लीन चीट दिली असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होती. त्यामुळेच त्यांनी हा अहवाल दडवून ठेवला, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. अकोला येथील एका कार्यक्रमात त्यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना हा खुलासा केला.
विदर्भातील भाजपच्या एका बड्या नेत्याने आपल्यावर खोटे शपथपत्र देण्यासाठी दबाव टाकला होता, असा आरोप तीन वर्षांपूर्वी परमवीर सिंग प्रकरणात करण्यात आला होता. विदर्भातील नेत्याने सांगितल्याप्रमाणे शपथपत्र मी दिले असते तर तीन वर्षांपूर्वीच महाविकास आघाडीचे सरकार पडले असते असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला.
मात्र, मी तसे शपथपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे माझ्या घरावर छापे टाकण्यात आले. तसेच माझ्यावर कारवाई करण्यात आली. माझ्यावर कारवाई करण्यामागे कोण आहे? हे मला माहित आहे, असे देखील अनिल देशमुख यांनी सांगितले. मात्र, त्यांनी त्याचे नाव सांगायला नकार दिला आहे.
दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कार्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवणारा मास्टरमाईंड कोण होता? याबाबत त्यांनी नाशिकमध्ये वक्तव्य केले होते. तसेच माझ्यावरील कारवाईमागे विदर्भातील मोठा नेता असून वेळ आल्यास त्याचे नाव जाहीर करेल, असे देखील देशमुख यांनी म्हटले होते.