Maharashtra Budget Session 2024 : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. याच मुद्दयावरून आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. ‘फसवणूक नको, आरक्षण द्या,’ असं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
तसेच मराठा समाजाच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा-ओबीसींची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत सरकार विरोधात निदर्शने केली. यावेळी “मनोज जरांगे पाटलांना छळतंय कोण? महायुतीचा त्रिकोण”, असे फलक देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हातात पाहायला मिळाली. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, अमीन पटेल, अमित देशमुख, धीरज देशमुख, भाई जगताप, राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.
दरम्यान, विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 5 दिवस चालणार आहे. तर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनात दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. अंतरिम अर्थसंकल्पात 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या चार महिन्यातील आवश्यक खर्चाची तरतूद केली जाईल. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते, कर्जाचे हप्ते, व्याज तसेच लोकसभा निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाचा समावेश असेल.