होम आयसोलेशन अॅप; जनतेसाठी खुले

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन; करोनाबाधितांवर लक्ष ठेवण्यासाठी उपयोग

पुणे – “कोविड-19 गृह विलगीकरण अॅप्लिकेशन’ (होम आयसोलेशन अॅप) हा पुणे महापालिकेने सुरू केलेल्या अॅपचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी विधानभवन येथे पार पडले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, अधिकारी उपस्थित होते.

गृह विलगीकरणातील करोना बाधितांच्या वापरासाठी व त्यांच्या आरोग्याच्या उपचारावर लक्ष ठेवण्यासाठी या अॅपचा उपयोग होणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

या अॅपमध्ये ताप, पल्स, ऑक्‍सिजन, खोकला, सर्दी, थकवा, रक्‍तदाब, मधुमेह इत्यादी गोष्टींचे मूल्यांकन घरी विलगीकरण केलेला रुग्ण स्वतः अॅपद्वारे साध्या क्‍लिकद्वारे करू शकतो. स्वतः च्या मदतीसाठी रुग्ण आपत्कालीन सतर्कता संदेश पाठवू शकतो, जो संदेश प्रभागनिहाय हेल्पलाइन क्रमांकावर पोहोचेल.

तसेच रुग्णाला विलगीकरण वैद्यकीय किट मागवता येईल. या अॅपच्या प्रभागनिहाय डॅशबोर्डवर तसेच मुख्यालयातील वॉर रूममध्ये एकत्रित डॅशबोर्डवर ऑक्‍सिजन, ताप इत्यादीसारख्या रुग्णाच्या लक्षणांवर व आरोग्याच्या स्थितीवर निरीक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ज्या रुग्णांकडे स्मार्टफोन नाही, त्यांचे आप्तजन आरोग्यविषयक माहिती पाठवू शकतात, असे आरोग्य विभागाने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.