नवी दिल्ली : देशभरात आज होळीच्या रंगांची उधळण होत आहे. याच रंगांच्या उधळणीसोबत भारतीय तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला असल्याचे दिसत आहे. देशभरात आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या 134 दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आज होळीच्या दिवशीही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दरम्यान, 3 नोव्हेंबर 2021 पासून केंद्र सरकारने पेट्रोल -डिझेल वरील उत्पादन शुल्क कमी केले होते. तेव्हापासूनच देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केले होते. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे दरात वाढ झाली नसल्याचेही सांगण्यात येत होते. दरम्यान, देशात निवडणूक निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत विक्रमी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन पाच दिवस उलटून गेल्यानंतरही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.