जळोची – शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे येईल असे वाटले होते मात्र; त्या तेथे सक्षम ठरल्या नसल्याचे सांगून त्या बारामती मतदार संघातही सक्षम नसल्याची खोचक टीका भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना केली.
बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या परिवर्तन हवा आहे. गेली पंधरा वर्ष एकच व्यक्ती खासदार म्हणून निवडून जात आहे. शिवाय आमचा घराणेशाहीला विरोध आहे. त्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार असल्याचा मनोदय ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, या आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार हे खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर सुप्रिया सुळे खासदार झाल्यानंतर आम्हाला आनंद झाला होता की, एखादी महिला या मतदारसंघाची प्रतिनिधित्व करत आहे. मात्र पंधरा वर्षापासून बारामती मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत तरी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना संधी मिळेल असे वाटत होते. मात्र खासदार सुळे याच पुन्हा मतदारसंघात फिरताना दिसतात. इतक्या वर्षापासून काम करत असणारे कार्यकर्ते पदाधिकारी केवळ सतरंज्या उचलण्यापुरतेच आहेत काय? असा सवाल उपस्थित करून त्यांनी घराणे शाहीला विरोध केला.
पवारांची लेक विरुद्ध सर्वसामान्यांची लेक, अशी लढाई गरजेची आहे. शिवाय जनतेतूनही मी बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची मागणी होत आहे. शिवाय यावेळेस वातावरण ही खूप चांगले असल्याचे देसाई यांनी सांगितले..
बारामतीत इतिहास घडवणार –
बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक भागातून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी नागरिकांकडून सांगितले जात आहे. अनेकांचे पाठिंबाचेही फोन येत आहेत. त्या अनुषंगानेच मी बारामती लोकसभा मतदार संघात जनसंपर्क दौऱ्याला सुरुवात करणार आहे. मात्र बारामती जिंकायची असेल तर भारतीय जनता पक्षाने जर मला उमेदवारी दिली तर मी बारामतीत इतिहास घडवू शकते, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.