चीन – ऑलिम्पियन तलवारबाज सीए भवानी देवी हिने तलवारबाजीमध्ये नवा इतिहास रचला आहे. चीनच्या वुक्सी प्रांतात रंगलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावत भवानी देवीने भारताची मान उंचावली आहे. त्यामुळे भवानी देवी ही या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरली आहे.
भवानी देवीने जपानची माजी जागतिक विजेती खेळाडू मिसाकी इमुराचा उपांत्यपूर्व फेरीत 15-10 असा पराभव केला व उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, उपांत्य फेरीत तिला उझबेकिस्तानच्या झायनाब दायिबेकोव्हाकडून 15-14 असा एका गुणाने निसटता पराभव पत्करावा लागल्याने ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भवानीच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.
अभिमानास्पद कामगिरी!
भारताची तलवारबाज भवानी देवी हिने आशियाई तलवारबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. भवानी देवी हिने या खेळातील विद्यमान जागतिक विजेतीला पराभूत केले. या खेळातील हे भारताचे पहिलेच पदक आहे. या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.… pic.twitter.com/wT9jjUcqRU
— Supriya Sule (@supriya_sule) June 20, 2023
ट्वीट करत सुप्रिया सुळे यांनी लिहिले की, “अभिमानास्पद कामगिरी! भारताची तलवारबाज भवानी देवी हिने आशियाई तलवारबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. भवानी देवी हिने या खेळातील विद्यमान जागतिक विजेतीला पराभूत केले. या खेळातील हे भारताचे पहिलेच पदक आहे. या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.”