‘ज्याला घडली नाही काशी, त्याने यावे जेजुरीशी’
अशी जेजुरीची धार्मिक महती सांगितली जाते. पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर जेजुरी येथे पेशवे तलावाच्या काठावर श्रीबल्लाळेश्वर मंदिर आहे. हे दगडी बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. खंडोबा गडावरून पाहिल्यानंतर पूर्वेकडे भव्य गोलाकार पेशवे तलाव दिसतो. या तलावाच्या पूर्वेकडील काठावर तलावाच्या तटबंदीमध्ये जमिनीच्या पोटात साठ फूट खोल दगडी बांधकामातील हे ऐतिहासिक मंदिर पाहण्यासारखे आहे.
तलावाच्या दगडी बांधकामातच या पुष्करणीची व त्यामध्ये आकर्षक मंदिराची उभारणी केली आहे. पुष्करणीत येणारे पाणी शेताला सोडण्यासाठी जलव्यवस्थापन केले आहे. तलावात पाणी असल्यानंतर येथील मंदिरातील गोमुखातून पाण्याची संततधार सुरू असते. गोमुखावरील गाभाऱ्यात शंकराची सुंदर दगडी पिंड आहे. तळ्यातील पाणी पिंडीवर घेण्यासाठी ते हाताने घेता येईल, अशी सोय केलेली आहे.
मणीमल्ल दैत्याच्या आणि राक्षसांच्या त्रासातून ऋषीमुनींची मुक्तता करण्यासाठी भगवान शिवशंकराने मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला, तो जयाद्री पर्वत म्हणजेच जेजुरी. नंदीचे दर्शन घेऊन पायऱ्या चढताना अनेक छोटी-मोठी मंदिरे, दीपमाळा दिसतात. मंदिराच्या गाभाऱ्यात प्राचीन स्वयंभू लिंग आहे. शेजारी मार्तंड भैरवाची भव्य मूर्ती आहे. खंडोबाच्या मूर्ती आहेत. पंचलिंग मंदिरात नित्य पूजा, अभिषेक करतात. रंगपंचमीच्या काळात सूर्यकिरणे थेट स्वयंभू लिंगावर व मार्तंडभैरवाच्या मूर्तीवर पडतात. महाशिवरात्रीला मंदिराच्या स्वयंभू शिवलिंगाबरोबर तळघरातील गुप्तलिंग व शिखरातील गुप्तलिंगाचे दर्शन घेता येते.
– माधुरी शिवाजी विधाटे