“हिरकणी’ भिडली सह्याद्रीच्या कातळाला

नगर – येथील भटकंती संस्था वाइल्ड लाइन ऍडव्हेंचरद्वारे आयोजित सांधण दरी येथील साहसी रॅपलिंग या साहसी प्रकारामध्ये पंच्याहत्तर वर्षीय हरिबाई स्वामी यांनी उत्स्फूर्त भाग घेतला. ज्या वयात त्यांच्या वयाचे बहुतांश लोकं घराबाहेर पडत नाहीत त्या वयात त्यांनी तरुणांना लाजवेल असे धाडस करून दाखवले. रॅपलिंगची नवी आयुधं लेऊन दोरखंडाच्या साहाय्याने त्या सह्याद्रीच्या रौद्र कातळाला भिडल्या आणि दरीच्या अवघड कडा उतरून खाली आल्या.

दरीच्या काठावर थांबून भल्या भाल्यांची भंबेरी उडते त्या कड्यावरून या वयातली खाली उतरण्याचं धाडस दाखवणाऱ्या या सत्तरीतल्या तरुण हिरकणीचं कौतुक करावं तेवढं कमीच. सह्याद्रीची रौद्रभीषणता आणि आपलेपणा नेमका काय समजून घेण्यासाठी सर्वानी घराबाहेर पडावं आणि सह्याद्रीच्या कातळकड्याना थेट भिडावं, असे त्यांनी या वेळी सर्व महाराष्ट्र वासियांना आवाहन केले.

या साहसी मोहिमेत नगर येथील या संस्थेच्या अश्‍विनी दरेकर, सई लांडे, सचिन राणे, गौतम बोरा, श्रेयस बोरा यांनी विशेष सहकार्य केले. भंडारदरा येथील रघुनाथ बोऱ्हाडे यांनी या साहसासाठी मार्गदर्शन केले. ही संस्था नेहमी एक वेगळ्या पर्यटनाला चालना देण्याचे कार्य करते. असे माहिती अभिजित दरेकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.