दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णय; सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे पाप

पिंपरी -महापालिका प्रशासनाने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे पाप केले आहे. शहरातील पाणीपुरवठा सुरळित करण्यात महापालिका आयुक्त आणि पदाधिकारी अपयशी ठरले आहेत, असा आरोप नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द न केल्यास विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांच्या सहभागाने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीतर्फे देण्यात आला आहे. समितीकडून अध्यक्ष मानव कांबळे, युवा अध्यक्ष प्रदीप पवार, उपाध्यक्ष दिलीप काकडे, सचिव गिरीश वाघमारे, सदस्य नीरजकुमार कडू, उमेश इनामदार यांनी आयुक्तांना याबाबत मागण्यांचे निवेदन दिले आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असताना असा निर्णय घेणे, ही शहरातील करदात्या नागरिकांवर अन्याय करणारी बाब आहे. शहरातील पाणीपुरवठा, थेट जलवाहिनी, अनधिकृत नळ जोडण्या, पाणी गळती, पाणी चोरी आदींबाबतचे धोरण बनविण्यात महापालिका आयुक्त आणि सत्ताधारी पदाधिकारी अपयशी ठरले आहेत. शहरामध्ये सध्या खासगी पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांचा सुळसुळाट झाला आहे. महापालिकेत सत्तेवर असलेल्या राजकीय नेत्यांचा आणि काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा त्यामध्ये हात आहे. अशा पाणी माफियांमार्फत सामान्य लोकांची आर्थिक लूट करण्यासाठी त्यांच्या प्रभावाखाली हा निर्णय घेतला असावा, असा संशय येत आहे.

दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाचा आमदार बनसोडेंकडून निषेध
महापालिका प्रशासनाने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा आमदार अण्णा बनसोडे, नगरसेवक जावेद शेख यांनी निषेध केला असून हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत नगरसेवक शेख व आमदार बनसोडे यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, पवना धरण शंभर टक्के भरलेले असतानाही शहरावर पाणी कपात लादण्यात आली आहे. पालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ही पाणी कपात शहरवासियांवर लादण्यात आली आहे. एक दिवसाआड पाणी कपात तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी आमदार बनसोडे यांच्या उपस्थितीत महापालिकेतील पाणी पुरवठा अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतरही कपात मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here