‘स्वत:च्या’च सापळ्यात अडकले “ते’

पिंपरी – पोलिसाचे फोटो काढून त्यांच्याकडे खंडणी मागायची दोन सराईतांना सवय झाली होती. नेहमीप्रमाणे चिंचवड स्टेशन येथे त्याने वाहतूक पोलिसाकडे खंडणी मागितली. खंडणी मागताना त्याने छुप्या कॅमेराद्वारे रेकॉडिंगही केले. मात्र पोलिसांनी त्यापैकी एकाला पकडले तर दुसरा पळून गेला. खंडणी मागताना त्याने केलेले रेकॉडिंग पोलिसांच्या हाती लागले. दुसऱ्यांसाठी लावलेल्या सापळ्यात आता तेच अडकले आहेत.

रवींद्र भागवत सातपुते (रा. हुनमान नगर, बारामती), विजय कोकरे (रा. बाणेर, पुणे) अशी खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. चिंचवड वाहतूक पोलीस विभागाचे कर्मचारी संदीप दादू कांबळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी सातपुते याला पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास फिर्यादी पोलीस कर्मचारी कांबळे हे चिंचवड स्टेशन येथे कर्तव्यावर होते. त्यावेळी आरोपी सातपुते व कोकरे हे तिथे आले. त्यांनी कांबळे यांचा मोबाईल घेत त्यावर फोटो आणि व्हिडिओ दाखवत आम्ही हे सोशल मीडियावर व्हायल करणार असल्याचे सांगितले. यापूर्वी आम्ही बऱ्याच पोलिसांचे रेकॉर्डिंग करून त्यांना घरी बसविले आहे. तुमचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करायचे नसतील तर तुमची किती पैसे देण्याची तयारी आहे. सध्या मला दहा हजार रुपये द्या आणि मोकळे करा. तुम्हाला काही होणार नाही. दहा हजार रुपये चिल्लर रक्‍कम आहे. बाकीची रक्‍कम फोनद्वारे संपर्क करून कळवतो, अशी धमकी देत पोलीस कर्मचारी कांबळे यांच्याकडे पैशाची मागणी केली.

कांबळे यांनी ही बाब आपल्या वरिष्ठांना सांगत आपली काहीही चूक नसल्याचे सांगितले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार कांबळे यांनी पिंपरी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातील कोकरे हा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांना आरोपींच्या गाडीत एक छुपा कॅमेरा आढळून आला. या कॅमेऱ्यातील रेकॉडिंग पोलिसांनी तपासले असता त्यात खंडणी मागत असतानाचे दिसून आले. यामुळे पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.