माहिजळगाव, (वार्ताहर)- माहीजळगाव चौफुला येथे जामखेड- श्रीगोंदा या रस्त्याचे काम चालू आहे. एक महिन्यापूर्वी झालेला काँक्रीट रोड आज पूर्ण खराब झाला असून, त्या काँक्रीटला जास्त पाणी न मारल्यामुळे रस्त्याला भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे.
माहिजळगाव येथील रोडचे काम चालू असताना बसस्थानक पाडले असून त्या जागेवर ठेकेदाराने बसस्थानक बांधले नाही. जुन्या बस स्टॅन्डची जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी बस स्टॅन्ड बांधले आहे. माहीजळगाव परिसरातून येणाऱ्या महिलांसह प्रवासी यांची निवाऱ्याअभावी कुचंबना होत आहे.
प्रवाशांना निवारा नसल्यामुळे उन्हात थांबावे लागत आहे. बसस्थानकची जुनी जागा असताना बस स्टॅन्ड लवकर बांधले जात नाही, याचे कोले उलगडत नाही. काँक्रीट रोड निकृष्ट दर्जाचा झाला असून, त्या कामाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. दोन-तीन दिवसांत जर या कामाची चौकशी झाली नाही तर परिसरातील सर्व नागरिक रस्त्यावर बसून आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.