मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात मंत्री नवाब मलिकांनी मोर्चा उघडला आहे. मलिक वानखेडे कुटुंबीयांविरोधात रोज नवीन आरोप करताना दिसत आहेत. दरम्यान, सध्या नवाब मलिक आणि भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. या प्रकरणात आता सोशल मीडियातील प्रसिद्ध चेहरा हिंदुस्तानी भाऊ उतरला आहे. हिंदुस्तानी भाऊने मोहित कंबोज यांना पाठिंबा दिला आहे.
हिंदुस्तानी भाऊ यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यात तो म्हणतो की, मोहित कंबोज तुम्ही खूप चांगले काम करत आहात. तुम्ही नशेडी, गंजेडी लोकांविरोधात तुम्ही जे आंदोलन उभं केले आहे. जे पाऊल उचललं आहे त्याच्या सपोर्टसाठी मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही जेव्हा मला बोलावल त्यावेळी मी हजर असेन असे तो म्हणाला आहे.
हिंदुस्तानी भाऊ सोशल मीडियात आपल्या व्हिडिओसाठी खूप प्रसिद्ध आहे. रोखठोक आणि बेधडक भूमिकेसाठी हिंदुस्तानी भाऊची तरुणाईमध्ये खूप क्रेझ आहे. यावरुनच त्याची बिग बॉससाठी निवड झाली होती. या कार्यक्रमातही ‘हिंदुस्तानी भाऊ’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांना ‘हिंदुस्तानी भाऊ’ त्याच्या शैलीत फिरकी घेतो. भाऊचे टिकटॉकवर 6 लाखाहून अधिक फॉलोअर्स होते, तर यूट्युबवर तब्बल १० लाखांपेक्षा अधिक सबस्क्राइबर्स आहेत.
हिंदुस्तानी भाऊ म्हणजे विकास जयराम पाठक हा जन्माने मुंबईकर आहे. तो आई-वडील, पत्नी आणि मुलगा आदित्य यांच्यासह मुंबईत राहतो. पुलवामा हल्ल्यानंतर भारताविषयी बोलणाऱ्यांना चपराक लगावण्यासाठी त्याने सहजच एक व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओला चांगले हिट्स मिळाले. विकासचे ‘हिंदुस्तानी भाऊ’ असे नामकरण झाले. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.