पिंपरी (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने विधानसभा मतदारसंघनिहाय महिला, युवा तसेच संस्कृती जोपासणार्या मतदान केंद्रासह सुमारे 34 आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात येणार आहेत. आवश्यक सुविधांनी युक्त ही मतदान केंद्रे मतदारांच्या स्वागतासाठी आणि मतदानासाठी सज्ज करण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र, युवा संचलित मतदान केंद्र आणि संस्कृती जोपासणारे आदर्श मतदान केंद्र असे प्रत्येकी एक केंद्र स्थापित केले जाणार आहे. महिला संचलित मतदान केंद्र म्हणून किवळे येथील पेंडसे कॉलनी विकासनगर मधील विद्याभूवन शाळेची खोली,
युवा संचलित मतदान केंद्र म्हणून बाबूरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खोली आणि मॉडेल (आदर्श ) मतदान केंद्र म्हणून रावेत येथील सिटी प्राईड शाळेतील खोली याप्रमाणे मतदान स्थापित करण्यात येणार आहेत.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र, युवा संचलित मतदान केंद्र आणि संस्कृती जोपासणारे आदर्श मतदान केंद्र असे प्रत्येकी एक मतदान केंद्र स्थापित करण्यात येईल. युवा संचलित मतदान केंद्र म्हणून मघनमल उधाराम वाणिज्य महाविद्यालयातील खोली आणि मॉडेल (आदर्श) मतदान केंद्र म्हणून दापोडी येथील गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलमधील खोली तसेच पिंपरी येथे महिला संचलित मतदान केंद्र देखील स्थापित करण्यात येणार आहेत.
मावळ विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र, युवा संचलित मतदान केंद्र आणि संस्कृती जोपासणारे आदर्श मतदान केंद्र असे प्रत्येकी एक मतदान केंद्र स्थापित केले जाणार आहेे. महिला संचलित मतदान केंद्र म्हणून जांभूळ येथील जिल्हा परिषद शाळा खोली तसेच युवा संचलित मतदान केंद्र म्हणून वडगाव येथील रमेशकुमार सहाणे इंग्लिश मीडियम स्कूलमधील खोली तर मॉडेल (आदर्श ) मतदान केंद्र म्हणून ऑक्सिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल लोणावळा याप्रमाणे मतदान केंद्रे स्थापित करण्यात येतील.
याशिवाय उरण विधानसभा मतदारसंघात 5 महिला संचलित मतदान केंद्र, 5 युवा संचलित मतदान केंद्र आणि 1 संस्कृती जोपासणारे आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात येतील. तर पनवेल विधानसभा मतदारसंघात 1 महिला संचलित मतदान केंद्र, 1 युवा संचलित मतदान केंद्र आणि 1 संस्कृती जोपासणारे आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात येईल. याशिवाय कर्जत विधानसभा मतदारसंघात 5 महिला संचलित मतदान केंद्र, 5 युवा संचलित मतदान केंद्र आणि 1 संस्कृती जोपासणारे आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात येतील.