चेन्नई – राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक वेट्रीमारन यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले. राजा राजा चोल हिंदू नव्हते असे त्यांनी म्हटले होते व ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनीही वेट्रीमारन यांच्या या वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे आता तेही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
राजा चोल हिंदू नव्हते. मात्र हे सगळे भारतीय जनता पार्टीने सुरू केले आहे. ते आपल्यापासून आपली ओळख हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी अगोदरच थिरूवल्लूवर यांचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण असे होऊ देता कामा नये असे वेट्रीमारन यांनी एका कार्यक्रमात सांगितले. ते जेव्हा हे बोलत होते तेव्हाच तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
मात्र नंतर कमल हसन यांनीही त्यांच्या म्हणण्याचे समर्थन करत ते म्हणाले की, चोल राजांच्या काळात हिंदू धर्मच नव्हता. त्यावेळी वैष्णव, शैव आणि समानम एवढेच होते. ब्रिटिशांना हे सगळे एकत्रित कसे मांडायचे हे माहिती नसल्यामुळे त्यांनी हिंदू शब्द रूढ केला. जसे त्यांनी थुथुकोडीचे तुतीकोरीन केले.
चोल राजांच्या जिवनावर आधारीत एका काल्पनिक कादंबरीवरचा पोन्नीयी सेल्वन हा मणिरत्नम यांचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर वेट्रीमारन यांनी हे विधान केले आहे. दरम्यान, भाजप नेते एच. राजा यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राजा चोल हिंदूच होते असे नमूद करत राजा म्हणाले की वेट्रीमारन यांच्याएवढा माझा इतिहासाचा अभ्यास नाही. मात्र चोल राजांनी बांधलेल्या दोन मशिदी किंवा चर्च त्यांनी दाखवून द्यावीत.