नवी दिल्ली : संपूर्ण देशातील वातावरण तापवणाऱ्या जेएनयू हल्ल्याची जबाबदारी हिंदू रक्षा दल या फारशा ज्ञात नसलेल्या संघटनेने स्वीकारली आहे. त्या संघटनेने केलेल्या दाव्यात सत्यता आहे काय, यादृष्टीने आता दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मुखवटे परिधान केलेल्या एका गटाने रविवारी रात्री जेएनयूच्या आवारात धुडगूस घातला. त्या गटाने विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर हल्ला केला. त्या हल्ल्याचा देशभरातून तीव्र निषेध केला जात आहे. तो हल्ला नेमका कुणी घडवला यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
अशातच हिंदू रक्षा दल या संघटनेचा प्रमुख म्हणवणाऱ्या पिंकी चौधरी उर्फ भूपेंद्र तोमर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल झाला. त्यात त्याने जेएनयूमधील हल्ला आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घडवल्याचे म्हटले. नंतर तो काही वृत्तवाहिन्यांशीही बोलला.
जेएनयू म्हणजे देशविरोधी कारवायांचे केंद्र बनले आहे. तशा कारवाया करणाऱ्यांची अवस्था जेएनयूमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांसारखी केली जाईल, असा इशारा त्याने दिला. आता चौधरीच्या दाव्यात तथ्य आहे की तो केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करत आहे, याची चाचपणी दिल्ली पोलिसांकडून केली जात आहे.