कॉंग्रेसच्या सत्यशोधन समितीची जेएनयुला भेट
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्त शेकडो दिल्लीकर रस्त्यावर उतरले. त्यांनी या कुलगुरूंची हकालपट्टी करण्याची मागणी केली. या मोर्चात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, कॉंग्रेसच्या सत्य शोधन समितीने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला भेट दिली.
शेकडोंचा मोर्चा
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अलिकडेच झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ दिल्लीत सामाजिक संघटनांसह शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हकालपट्टीची मागणी केली. मंडी हाऊसपासून निघालेल्या मोर्चात सहभागी झालेल्यांच्या हातात फलक होते. हा मोर्चा मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या दिशेने जात होता. दि. पाच रोजी झालेल्या हिंसाचारात 34 जण जखमी झाले होते. यात सहभागी असणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करणाऱ्या घोषणा मोर्चेकऱ्यांनी दिल्या.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी, प्रकाश कारत, डी. राजा आणि वृंदा कारत यात सहभागी झाल्या होत्या. लोक जनशक्ती पक्षाचे शरद यादवही या मोर्चात सहभागी झाले होते.
येचुरी म्हणाले, विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जवळपास तीन तास बुरखेधारी गुंड मारहाण करत होते. पोलिस मुख्य प्रवेशद्वारावर उपस्थित असताना त्यांनी आवारात प्रवेश केला. कुलगुरूंना या घटनेची कल्पना असल्या खेरीज हे घडणे शक्य नाही. कुलगुरूंनी राजीनामा द्यायलाच हवा.
कॉंग्रेसचे सत्यशोधन
पक्षाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगुरू एम. जगदेशकुमार यांची भूमिका, दिल्ली पोलिसांची भूमिका, विद्यापीटात बाहेरच्या गुंडांना प्रवेश करण्यासाठी विद्यापीठात राहणाऱ्यांनी कशा पध्दतीने मदत केली, आणि विद्यापीठातील काही प्राध्यापकांची भूमिका याबर या सत्यशोधन समितीचा भर असेल. दरम्यान, जेएनयुतील हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. ही चार सदस्यीय समिती आपला अहवाल पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सादर करतील. या अहवालावर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत चर्चा करण्यात येणार अहे.