लाहोर : पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात पाकिस्तान एअर फोर्स (पीएएफ)चे एक लढाऊ विमान कोसळून झालेल्या अपघातात विमानातील दोन्ही पायलट ठार झाले.
नियमित ऑपरेशनल ट्रेनिंग मिशनवरील हे विमान लाहोरपासून सुमारे 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या मियांवलीजवळ दुर्घटनाग्रस्त झाले, असे पीएएफने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे मूळ शहर असलेल्या मियांवलीमधील एका मोकळ्या ठिकाणी हे विमान कोसळले.
हवाई दलाच्या मुख्यालयाने अपघाताचे कारण निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. बचाव दल घटनास्थळी दाखल झाले असून आणि त्यांनी मृतदेह लष्करी रुग्णालयात हलवले. बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी या परिसराची नाकाबंदी केली आहे. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दुर्घटनेपूर्वी वैमानिकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नसावी, असे दिसते आहे.