नवी दिल्ली : जवाहरलाला नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराची दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने चौकशी सुरू केली. पोलिसांचे एक डझन अधिकारी विद्यापीठाच्या आवारात तळ ठोकून आहेत. या दरम्यान पोलिसांनी जेएनयु विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आईशी घोष यांचीही चौकशी केली.
पोलिसांनी हल्लेखोर म्हणून ओळख पटवलेल्या नऊ जणांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या नऊ जणांत सात जण डाव्या संघटनांशी संबंधित आहेत. त्यापैकी घोष यांच्यासह भास्कर विजय आणि पंकज यांची चौकशी सोमवारी करण्यात आली.
पाच डिसेंबरला झालेल्या या हिंसाचारात जखमी झालेल्या आईशी घोष यांची चौकशी सकाळी स्वतंत्रपणे करण्यात आली. तिला कोण मारले आणि हल्लेखोरांना ती ओळखू शकेल का? हे प्रश्नही अन्य प्रश्नासोबत त्यांना विचारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यामुळे तिला पडलेल्या टाक्यांची माहिती पोलिसांनी घेतली.
एका टीव्ही चॅनेलने केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये नावे उघड झालेल्या अक्षत अवस्थी आणि रोहीत शहा यांनी तपासात सहभागी होण्यास नकार दिला. मात्र ते मंगळवारी तपासासाठी हजर होतील, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी कोमल शर्मा या बुरखेधारी महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा फोन बंद असल्याचे आढळून आले. तिला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ती दिल्ली विद्यापीठाच्या दौलतराम महाविद्यालयात शिकत आहे.
भास्कर विजय आणि पंकज यांची एकत्र चौकशी करण्यातआली. माहितीच्या एक एक बिंदू गोळा करत पोलिस या हिंसाचाराच्या मुळाशी जात आहेत, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या हिंसाचारात सहभागी असल्याचा संशय असणाऱ्या व्हॉटस् ऍप ग्रुपवरील 37 जणांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.