नवी दिल्ली – भारताची युवा सुवर्णकन्या म्हणून ख्याती मिळविलेल्या हिमा दासने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा मिळविला आहे. तिने चेक प्रजासत्ताकमध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत 300 मीटर्सची शर्यत जिंकली.
हिमाने या मोसमात मिळविलेले हे सहावे विजेतेपद आहे. तिने त्याआधी याच देशातील नोव्हेमेस्टो स्पर्धेतील 400 मीटर्स शर्यतीतही विजेतेपदाची कमाई केली होती. तिने सांगितले की, परदेशात प्रथमच मला 300 मीटर्स शर्यतीत सुवर्णपदक मिळाले आहे. सहसा मी या अंतराच्या शर्यतीत भाग घेत नाही. मात्र अन्य परदेशी खेळाडूंचा अनुभव मिळावा म्हणूनच मी उतरले होते.
राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनासने चेक प्रजासत्ताकमधील स्पर्धेत 300 मीटर्स शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. त्याची दोहा येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तो म्हणाला की, जागतिक स्पर्धेसाठी अनुभव मिळावा यादृष्टीने मी 300 मीटर्सच्या शर्यतीत भाग घेतला होता. त्यामध्ये सोनेरी यश मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.