दिमुथ करूणारत्नेचे शैलीदार शतक
गॅले – कर्णधार दिमुथ करूणारत्ने याने केलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर श्रीलंकेने न्यूझीलंडविरूद्धचा पहिला क्रिकेट कसोटी सामना सहा गडी राखून जिंकला आणि या दोन संघांमधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विजयासाठी आवश्यक असणारे 268 धावांचे लक्ष्य त्यांनी 86.1 षटकांत व चार गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
करूणारत्ने हाच लंकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने लाहिरू थिरीमाने याच्या साथीत सलामीसाठी 60.2 षटकांत 161 धावांची भक्कम भागीदारी करीत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्यांनी उभय संघांमधील सलामीसाठी केलेल्या 161 धावांच्या भागीदारीच्या विक्रमाची बरोबरी साधली. 1991 मध्ये न्यूझीलंडच्या जॉन राईट व ट्रेव्हर फ्रॅंकलीन यांनी हा विक्रम केला होता. 310 मिनिटांच्या खेळात करूणारत्ने याने 122 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 6 चौकार व 1 षटकार अशी फटकेबाजी केली.
थिरीमाने याने 64 धावा करताना 4 चौकार मारले. ही जोडी फोडण्यासाठी न्यूझीलंडकडून गोलंदाजीत अनेक वेळा बदल झाले. मात्र त्यांनी न्यूझीलंडच्या संमिश्र माऱ्यास जबाबदारीने तोंड देत 60 षटके खेळून काढली. अखेर न्यूझीलंडच्या विल्यम सोमेरविलाने थिरीमानेला बाद करीत ही जोडी फोडली. ही जोडी बाद झाल्यानंतर मधल्या फळीत अँजेलो मॅथ्युज (नाबाद 28) याच्या साथीत करूणारत्नेने तिसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी करीत संघाचा विजय दृष्टीपथात आणला. कुशल परेराने5 चौकारांसह 23 धावा टोलविल्या.
संक्षिप्त धावफलक –
न्यूझीलंड 249 व 285 श्रीलंका 267 व 86.1 षटकांत 4 बाद 268 (दिमुथ करूणारत्ने 122, लाहिरू थिरीमाने 64, अँजेलो मॅथ्युज नाबाद 28, कुशल परेरा 23, ट्रेंट बोल्ट 1-34, टीम साऊदी 1-33, विल्यम सोमेरविला 1-73, एजाज पटेल 1-74)