टोकियो – आघाडी घेतल्यानंतरही पराभव पत्करण्याची परंपरा भारतीय पुरूष हॉकी संघाने कायम राखली आहे. येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक टेस्ट इव्हेन्टमध्ये त्यांना न्यूझीलंडने 2-1 असे पराभूत केले.
सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला कर्णधार हरमानप्रितसिंगने भारताचे खाते उघडले. मात्र न्यूझीलंडच्या जेकब स्मिथ (47 वे मिनिट) व सॅम लॅनी (60 वे मिनिट) यांनी गोल करीत संघास विजयश्री मिळवून दिली. भारताने पहिल्या सामन्यात मलेशियाचा 6-0 असा धुव्वा उडविला. मंगळवारी भारताची जपानबरोबर लढत होणार आहे.
सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत हरमानने संघाचा एकमेव गोल केला. या गोलच्या आधारे भारताने 47 व्या मिनिटांपर्यंत वर्चस्व राखले होते. मात्र नंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी जोरदार चाली करीत भारताचा बचाव हाणून पाडला आणि सामना जिंकण्याच्या भारताच्या आशा धुळीस मिळविल्या.