पुणे, दि. 9 – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदे (नॅक) कडून “ए प्लस प्लस’ ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त झाली आहे. यामुळे महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीत आणखी मोलाची भर पडली आहे. आता आणखी गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालय स्वायत्तता आणि स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
महाविद्यालयाचे विविध सात निकषांवर मूल्यंमापन करुन “नॅक’च्या तिसऱ्या फेरीत महाविद्यालयाला चार पैकी 3.66 “सीजीपीए’ अर्थात “क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट ऍव्हरेज’ गुण प्राप्त झाले असून राज्यातील महाविद्यालयांमध्ये हे सर्वोच्च मानांकन ठरले आहे. याबाबतची प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सचिव प्रा. डॉ. श्यामकांत देशमुख, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. ज्योस्ना एकबोटे, प्राचार्य प्रा. डॉ. कल्याणी जोशी आदींनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
शासनाने स्वायत्तता देत असताना कोणतेही र्निबंध लादणे योग्य नाही. अभ्यासक्रम निश्चिती, परीक्षा पद्धती राबविण्याबाबत स्वातंत्र्य देण्याचीही आवश्यकता आहे, असे मतही एकबोटे यांनी व्यक्त केले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना विविध कौशल्य विषयक उपक्रमांच्या प्रशिक्षणाला प्राधान्य देण्यात येत असते, असे प्राचार्य डॉ. कल्याणी जोशी यांनी सांगितले.
“एनबीए’ कडून सर्व विभागांचे मूल्यमापन करून घेणे, सर्व विभागांमध्ये रिसर्च सेंटर्स सुरु करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाकरिता राबवल्या जाणाऱ्या इतर उपक्रमांसाठी नव-नवीनराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर शैक्षणिक करार करणे हे महाविद्यालयाचे ध्येय असणार आहे.
दोन दशकांचा प्रवास करत महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात विविध नवे आयाम व मापदंड उभारले आहेत. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्राधान्य देण्यात येत असते. महाविद्यालयात आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. प्रशस्त वर्गखोल्या, सुसज्ज अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक कक्ष, भाषा प्रयोगशाळा, दृकश्राव्य प्रयोगशाळा आहे.
विद्यार्थ्यांमध्ये दर्जेदार शिक्षण रुजवण्यासाठी महाविद्यालय औद्योगिक संस्थांशी आणि उद्योग तज्ञांशी संलग्नित आहे. महाविद्यालयातील समृद्ध व सुसज्ज वाचनयालामध्ये विविध विषयांवरील पुस्तके, नॅशनल व इंटरनॅशनल जर्नल्स, विविध प्रोफेशनल सोसायटीजचे डिजिटल सबस्क्रिपशनस उपलब्ध आहेत.
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या दोन महाविद्यालयांना यापूर्वीच स्वायत्तता मिळाली असल्याने तीन महाविद्यालयांचे मिळून समूह विद्यापीठ स्थापन करणेही शक्य होणार आहे. स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झालेल्या संस्थेच्या महाविद्यालयांना शासनाने मानाने विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. यात मॉडर्न महाविद्यालयालाही विद्यापीठाचा दर्जा निश्चितपणे मिळणार आहे.
– डॉ. गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी