वर्धा – येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराय मेत्री यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यापीठाच्या कुलाध्यक्ष म्हणून केलेली कुलगुरूंची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी रद्द केली. न्या. अनिल किलोर आणि न्या.एम. एस. जवळकर यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.
राष्ट्रपतींनी केलेल्या कुलगुरूंच्या नियुक्तीला हिंदी विद्यापीठाचे प्रा. डॉ. लेला कारूण्यकारा यांनी नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. याचिकेनुसार हिंदी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ला यांनी १४ ऑगस्ट २०२३ रोजी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा दिला होता. राष्ट्रपतींनी प्रा. शुक्ला यांचा राजीनामा स्वीकारून हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ.भीमराय मेत्री यांच्याकडे सोपवला.
डॉ.लेला कारुण्यकारा यांनी डॉ. मेत्री यांच्या कुलगुरूपदी नियुक्तीला आव्हान दिले आहे. या प्रकरणी न्यायालयाने भारताच्या राष्ट्रपतींना हिंदी विद्यापीठाचे कुलाध्यक्ष म्हणून नोटीस बजावली होती.
गुरुवारी झालेल्या या प्रकरणावरीलसुनावणीत न्यायालयाने डॉ. कारुण्यकारा यांची याचिका मान्य करत हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती रद्द केली. याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड.फिरदोस मिर्झा आणि केंद्र सरकारच्या वतीने डेप्युटी सॉलिसिटर जनरल अॅड. नंदेश देशपांडे यांनी बाजू मांडली.
असा आहे याचिकाकर्त्याचा दावा
कायद्यानुसार कुलगुरूंनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यास प्र-कुलगुरूंची कुलगुरूपदावर नियुक्ती करावी, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. पण प्रा. शुक्ला यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिल्यावर प्र-कुलगुरू पदावर कोणाचीही नियुक्ती झाली नाही. या कारणास्तव कुलगुरू पदावर कोणाची नियुक्ती होईपर्यंत तेथे वरिष्ठ प्राध्यापकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे डॉ. मेत्री यांची हिंदी विद्यापीठाच्या कुलाध्यक्षांनी केलेली नियुक्ती नियमांचे उल्लंघन करणारी आहे.