शेतकऱ्यांना हेक्‍टरी 1 लाखांची मदत द्या!

संयुक्त पुरोगामी आघाडीची राज्यपालांकडे मागणी
शेतकऱ्यांचे पिक व वीज बील माफ करा
मुंबई : राज्यात अवकाळी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले असून सरकारने हेक्‍टरी 1 लाख रुपयांची मदत तत्काळ द्यावी. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पीक आणि वीज बील माफ करावे, अशी मागणी संयुक्त पुरोगामी आघाडीच्यावतीने राज्यपालांकडे करण्यात आली.

अवकाळी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला असून हातातोंडाशी आलेल्या पीकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकाने दिलासा देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, धीरज देशमुख, शरद रणपिसे, यशोमती ठाकुर, हुस्नबानू खलिफे, अनिकेत तटकरे आदींचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता. या भेटीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली.

परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचा विचार करता सरकारने 10 हजार कोटी रुपयांची जाहीर केलेली रक्कम अपुरी असून 25 हजार कोटीची रक्कम मिळाली पाहिजे, अशी मागणी केली. नुकसानीचे अजून पंचनामे सुरू आहेत, 6 तारखेपर्यंत मुदत दिली आहे.

ही मुदत वाढवून देण्याची मागणी केली असून सोयाबीन, तूर, ज्वारी आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचे पवार यांनी सांगितले. राज्यातला 750 किलोमीटरच्या सागरी किनाऱ्यावर मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याबाबतीत ही सरकारने विचार करावा आणि राज्यपालांनी याबाबतच्या सूचना कराव्यात असेही, अजित पवार यांनी सांगितले.

सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही – थोरात
पुरातील बाधित लोकांसाठी 6800 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारने केली होती. ती मदत अद्याप मिळालेली नाही. आता दहा हजार कोटींची मदत कधी मिळणार असा सवालही बाळासाहेब थोरात यांनी सरकारला केला. खासगी कंपन्यांनी विम्याची नफेखोरी केली असून सरकारने ती मदत मिळवून दिली पाहिजे अशी मागणी थोरात यांनी केली. काळजीवाहू सरकार आहे, पण सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही. सरकारने भक्कमपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे असेही थोरात म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)