लखनौ: उत्तरप्रदेश पॉवर कॉर्पोरेशनचे 2600 कोटी रूपये बुडित निघालेल्या डीएचएफएल कंपनीत गुंतवण्याचा एक मोठा घोटाळा उघडकीला आला असून या प्रकरणी पॉवर कॉर्पोरेशनचे माजी व्यवस्थापिय संचालक ए.पी. मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने आर्थिक गुन्हे, विभागाकडे सोपवला असून त्यांनीच मिश्रा यांना अटक केली आहे. प्रॉव्हिडंट फंड ट्रस्टशी संबंधीत दोन पदाधिकाऱ्यांनाहीं अटक करण्यात आली आहे. प्रविणकुमार गुप्ता आणि सुधांशु द्विवेदी अशी त्यांची नावे आहेत.
राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे, देण्याचा निर्णय घोषित केला आहे. या घोटाळ्यामुळे, पॉवर कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी तीव्र संतापही व्यक्त केला आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास हाती घेई पर्यंत आर्थिक गुन्हे विभागाकडून याची चौकशी सुरू राहील असेही सरकारने स्पष्ट केले आहे.