बर्लिन :- जर्मनीच्या काही भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच फ्रॅन्कफर्ट विमानतळावरील काही आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे देखील रद्द करावी लागली आहेत. पावसामुळे विमानतळाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे विमानांची हालचाल सुमारे दोन तासांसाठी थांबवावी लागल्याचे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
रात्री 11 वाजेपर्यंत 70 विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. त्यानंतर विमानसेवा औपचारिकपणे स्थगित करावी लागली. फ्रॅन्कफर्टच्या दिशेने गेलेल्या 23 विमानांना देखील आपला मार्ग अन्य विमानतळांच्या दिशेने बदलावा लागला.
दक्षिण-पश्चिम आणि मध्य जर्मनीच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक इमारतींची तळघरे आणि रस्त्यावर पूराचे पाणी आले आहे.
पश्चिम रुहर जिल्ह्यातील गेल्सेनकिर्चेनमध्ये अनेक महामार्ग आणि भुयारी मार्ग पाण्याखाली होते तेथे लोकांना त्यांच्या कारमधून वाचवण्यात आले, असे अग्निशमन सेवेने सांगितले.