पुणे – गणेशोत्सव बहरात आलेला असताना उत्सवाच्या पाचव्या दिवशीही शहरात धो-धो पाऊस झाल्याने शहरातील रस्ते जलमय झाले. साचलेल्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पालिका प्रशासनाची धावपळ उडाली. शहरावर दिवसभर प्रचंड काळे ढग दाटून आले होते. सकाळपासूनच भुरभूर सुरू झाली होती. शहरासह उपनगरांत दुपारनंतर पावसाचा जोर वाढत गेला. काही ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळाला. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत शहरात 22 मिमी पावसाची नोंद झाली. लोहगाव परिसरात सर्वाधिक 36 मिमी पाऊस झाला.
जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात चार दिवस झालेला पाऊस तर जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यात अधून-मधून हलक्या सरींचा, त्यानंतर तब्बल दीड महिन्यांपासून पाऊस दडी मारून बसला होता. दोनवेळा पाऊस उंबरठ्यावर येऊन माघारी गेला, त्यामुळे शहरात पाऊस कधी पडणार, धरणे कधी भरणार? या चिंतेने पुणेकर पावसाची आतुरतेने वाट पाहात होते. गणरायाच्या आगमनानंतर दोन दिवसांनी गुरुवारी (दि.21) पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली.
दोन दिवस हलक्या व मध्यम सरी पडल्या. मात्र, शनिवारी (दि. 23) सकाळपासून पावसाचा जोर होता. दुपारी एक वाजल्यापासून पावसाचा जोर वाढल्यामुळे सर्व रस्त्यांना ओढे-नाल्यांचे स्वरूप आले. शहराच्या मध्यवर्ती भागात सायंकाळपर्यंत 22 मिमी पाऊस झाला. तर लोहगाव परिसरात 38, चिंचवडमध्ये 40 यासह मगरपट्टा, पाषाण, एनडीए, वडगावशेरी, कोरेगाव पार्क या भागात पावसाची नोंद झाली. दरम्यान, शहरात पुढील तीन दिवस चांगला पाऊस पडेल. मध्यशहर तसेच उपनगरीय भागातही पावसाच्या जोरदार सरी अधून-मधून पडतील. घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
- पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ
- शहर आणि उपनगरांतील रस्ते पाण्याखाली
- गणेशोत्सवाचा पाचवा दिवस पावसात