पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभागरचनेवर प्राप्त हरकतींवर आज ऍटो क्लस्टर येथे सुनावणी झाली. आठ क्षेत्रीय कार्यालयानुसार 96 विभागामध्ये ही सुनावणी सुरळीत पार पडली. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी विहीत नमुन्यात राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. या शिफारशींवर राज्य निवडणूक आयोग काय निर्णय देणार याकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे.
प्रभागरचनेवर तब्बल 5 हजार 684 हरकती प्राप्त झाल्या. प्राप्त हरकतींवर सुनावणीसाठी सहकार आयुक्त अनिल कवडे यांची नियुक्ती केली होती. त्यांनी आज (दि. 25) ऍटो क्लस्टर येथे सुनावणी घेतली. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासह राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस, विधी सहाय्यक ऍड. सुरज चकोर, पुणे विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी अप्पर जिल्हाधिकारी वर्षा उंटवाल, पुणे जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी अप्पर जिल्हाधिकारी नयना बोंदार्डे, महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
सुनावलीला उपस्थित राहिलेल्या हरकतदारांनी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे, हरकती आणि सूचना मांडल्या. या सुनावणीसाठी विद्यमान व माजी नगरसेवकांसह इच्छुक देखील मोठ्या प्रमाणावर उपास्थित होते. याबाबतचा अहवाल बुधवारी (दि. 2) राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. नागरिकांनी घेतलेल्या हरकतीनुसार प्रभागरनेमध्ये बदल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.