शहरी मालमत्तेवरील हक्कांवर बंधने येणार
मुंबई, दि. 25 – शहरी मालमत्तेवरील मालकी हक्क बदलण्यावर बंधने आणणारे खास विधेयक मांडण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करीत आहे. केंद्र सरकारचे या संबंधीचे विधेयक अमलात येईपर्यंत या विधेयकाची अंमलबजावणी चालू राहील, अशी माहिती महसूलमंत्री डॉ. रफीक झकेरिया यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. सदर सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्याचे ते म्हणाले. शेतजमिनीवरील सिलिंग कायद्यास राष्ट्रपतींची परवानगी अजून मिळालेली नाही. उद्यापासून एसटी दरात होणाऱ्या भाडेवाढीच्या निषेधार्थ आज समाजवादी आघाडी व राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सदस्यांनी सभात्याग केला.
भेसळ प्रतिबंधक बिल दुरूस्ती मंजूर
मुंबई – आज विधानपरिषदेत भेसळ प्रतिबंधक कायद्याला दुरूस्ती सुचविणारे बिल मंजूर करण्यात आले. यामुळे कायद्याची अंमलबजावणी होईल.
नेपाळ हा शांतता विभाग म्हणून जाहीर करा नेपाळ नरेशांची विनंती
काठमांडू – आज नेपाळचे नरेश वीरेंद्र यांनी परराष्ट्रीय पाहुण्यांना राजवाड्यात निरोपाची मेजवानी दिली. त्या वेळी ते पाहुण्यांना उद्देशून केलेल्या भाषणात म्हणाले, आशियातील दोन मोठी राष्ट्रे भारत व चीन यांचे दरम्यान नेपाळी राज्य वसले आहे. त्यामुळे हे राज्य शांतता विभाग म्हणून जाहीर करण्यात यावे.
काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे शेख अब्दुल्लांनी हाती घेतली
जम्मू- शेख महंमद अब्दुल्ला यांचा आज जम्मू-काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. मिर्झा महंमद अफझल बेग, सोनाम नोर्बू व देवीदास ठाकूर यांचा मंत्री म्हणून शपथविधी झाला. सुमारे बावीस वर्षांनंतर आज शेख अब्दुल्लांनी जम्मू-काश्मीरची सूत्रे पुन्हा हाती घेतली. राज्यपाल एल. के. झा यांनी शपथ दिली.