कोलकाता – बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आपली प्रकृती उत्तम असून पुढील काही दिवस आराम केल्यानंतर पुन्हा कामकाजात कार्यरत होणार आहे, अशा शब्दात गांगुली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जिममध्ये व्यायाम करत असताना गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दक्षिण कोलकाता येथील वूडलॅंड या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर ऍन्जिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. माझ्यावर वेळीच योग्य ते उपचार करणाऱ्या रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचे धन्यवाद. माझी प्रकृती सध्या उत्तम आहे, असेही गांगुली यांनी सांगितले.
त्यांना बुधवारीच घरी सोडले जाणार होते. मात्र, स्वतः गांगुली यांनीच आणखी एख दिवस रुग्णालयातच राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना आज सोडण्यात आले. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याने त्यांच्यावर होणारी दुसरी ऍन्जिओप्लास्टी पुढे ढकलण्यात आली आहे.