मुंबई : कधी कधी आपल्या आयुष्यात कोण देवदूत बनून येतो आणि आपल्या संकटाचे निरसन करतो याचा भरोसा नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. मुंबईतील एक रिक्षाचालक महिलेसाठी देवदूत ठरला आहे. पेटलेल्या अवस्थेत जीवाच्या आकांताने मदतीची याचना करणाऱ्या महिलेला रिक्षाचालक मोहम्मद इस्माईल शेख यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवले आहे. मुंबईतील नेहरुनगर पोलिसांनी मोहम्मद इस्माईल यांचा सत्कार करुन त्यांच्या धाडसाचे आणि मानवतेचे कौतुक करण्यात आले.
संबंधित महिला चुनाभट्टीमधील सुमननगर इथली रहिवासी आहे. 14 जून रोजी ही महिला वडाळा इथे कामावर जात होती. सकाळी आठच्या सुमारास ही महिला अण्णाभाऊ साठे ब्रिजजवळ बस स्टॉपवर आली. घरातून निघण्यापूर्वी महिलेचं पतीसोबत भांडण झाले होते.
पतीने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. यावेळी तिचा पती सव्वाआठच्या सुमारास अचानक तिच्याजवळ आला. त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून लायटरने आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी ती मदतीसाठी याचना करत होती. परंतु कोणीही थांबले नाही.
अखेर रिक्षाचालक मोहम्मह शेख यांनी थांबून महिलेच्या अंगावर पाणी ओतून आग विझवली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. यानंतर महिलेच्या भावाच्या तक्रारीवरुन नेहरुनगर पोलीस ठाण्यात आरोपी संजय रमाकांत ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.