सातारा – फेसबुक, व्हॉट्सऍप अथवा अन्य सोशल मिडीयामध्ये प्रसिद्ध झालेले साहित्य, कविता, लेख अनेक जण स्वत:च्या नावावर बिनदिक्कतपणे खपवत असतात. मूळ लेखकाचे नाव काढून, स्वत:चे नाव टाकून असे साहित्य पुन:प्रकाशित केले जाते. मात्र, अशा वाड्.मयचौर्याला आळा बसण्यासाठी येथील कायदेतज्ज्ञ वकील महिलेने साहित्यचोराला न्यायालयात खेचले आहे. ऍड. सीमन्तिनी नूलकर या कॉपीराईट कायदा आणि बौद्धीक संपदारक्षण या क्षेत्रात काम करतात. व्यवसायाने वकील असून त्यांचे प्रवासासह विविध विषयांवर ललित लेखनही सुरु असते. “सातारची खाद्यपरंपरा’ या विषयावरचा त्यांचा एक लेख त्यांच्याच “बिरिस्ता’ या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे. हा लेख अनेकदा पु. ल. देशपांडे यांचा लेख म्हणून समाजमाध्यमात लोकप्रिय केला गेला.
मात्र, “हा लेख पुलंचा नसून माझा आहे..’ एवढीच स्पष्टीकरणाची भूमिका नूलकर यांनी ठेवली होती. मात्र, आता मूळचे सातारचेच असलेल्या अभिनेते, दूरदर्शन निवेदकाने ऍड. नूलकर यांचा लेख स्वत:च्या नावे “मराठी वाचाल तर वाचाल” या फेसबुक समूहावर प्रसिद्ध केला. त्यामुळे संतापलेल्या ऍड. नूलकर यांनी त्यांना कॉपीराईट कायद्याखाली (बौद्धीक स्वामित्त्व कायदा) नोटीस पाठवली असून नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणातून धडा घेत समाज माध्यमांत अशा प्रकारे दुसऱ्याचे साहित्य स्वत:च्या नावे छापण्याच्या प्रवृत्तीला आळा बसेल, असे मानले जात आहे. याबाबत त्या निवेदकाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, व्हॉट्सऍप फॉरवर्डमधून लेखकाचे नाव नसलेला हा लेख त्यांच्याकडे आला असता तो लेख आवडल्याने आपण आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केला. मात्र, त्याखाली हा लेख मी लिहिलेला आहे, असे कुठेही म्हटलेले नाही. तरीही ऍड. नूलकर यांना त्रास झला असेल तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करण्यास तयार आहे.
सुशिक्षित व्यक्तीने एकदा नव्हे तर दोनदा माझ्या लेखाबाबत असलेल्या कॉपीराईटचा जाणिवपूर्वक भंग केला. त्यामुळे सोशल मिडीयातील या चोरीच्या प्रकारांना आळा बसण्यासाठी हे कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले आहे. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावता कामा नये, म्हणून आता दिवाणी आणि फौजदारी स्वरुपाची कारवाई करत आहे.
– ऍड. सीमन्तिनी नूलकर (कायदेतज्ज्ञ, लेखिका)