कोपरगाव – कोपरगाव शहरात पालिका हद्दीतील समतानगर, शिंगी, शिंदे नगर व महात्मा फुले नगर येथे मोठया प्रमाणात नागरी रहिवास असून शेजारीच चर्च, शाळा असल्याने या भागात कुठल्याही मद्य व्यवसायास परवानगी देवु नये, असे निवेदन या भागातील नागरिकांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना मंगळवारी दिले. मात्र, त्या निवेदनाची दखल न घेता नागरिकांचा विरोध डावलून मद्य व्यवसायास परवाना दिल्यास समतानगर, शिंगी शिंदेनगर व महात्मा फुले नगर परिसरातील नागरीक जन आंदोलन करतील, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शैलेश साबळे यांनी दिला.
साबळे यांनी पुढे म्हटले असे आहे की, समतानगर, शिंदे शिंगीनगर व महात्मा फुले नगर येथे मोठया प्रमाणात नागरी वस्ती असून महाजन गोठयाजवळ नव्याने बिअर व वाईन शॉपी सुरू करण्याबाबतचे प्रकटन काढण्यात आले आहे.
त्यामुळे या भागातील रहिवाश्यांना मोठया प्रमाणात मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. नागरीकांनी मंगळवारी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना समक्ष भेटले असून त्यांना याबाबतची सर्व वस्तुस्थिती समजावुन सांगितली. याठिकाणी कुठल्याही मद्य व्यवसायास परवानगी देवु नये म्हणून विरोध दर्शविला आहे. या जागेवर मद्य व्यवसायास परवानगी दिल्यास त्यातून तरूणपिढीमध्ये व्यसनाधिनता वाढुन गोरगरीब जनतेचे प्रपंच उध्वस्त होणार आहे. मद्यपींचा त्रास महिला भगिनीसह शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणार आहे.
नागरिकांच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून या ठिकाणी कुठल्याही मद्य व्यवसायास परवाना देण्यात येवु नये, असेही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर समतानगर, शिंदे शिंगीनगर, महात्मा फुलेनगर परिसरातील रहिवासीयांच्या स्वाक्षऱ्या आहेत.