मुंबई – भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार ‘ए. आर. रहमान’ यांचा आज (६ जानेवारी) वाढदिवस आहे. रहमान यांचा जन्म ६ जानेवारी १९६६ साली तामिळनाडू मधील एका संगीतिय कुटुंबात झाला. रहमानचे मूळ नाव ए. एस. दिलीपकुमार असे आहे.
रहमान यांच्या संगीताचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या चाली या अतिशय कठीण असतात. मात्र, रहमान यांची गाणी ऐकताना त्यातून काही तरी अद्भूत गवसल्यासारखे वाटते.
रहमान यांनी वयाच्या ११व्या वर्षी आपला मित्र शिवमणीसोबत बॅन्ड रूट्ससाठी कि-बोर्ड वाजवण्यास सुरूवात केली आणि त्यांच्या संगीतमय प्रवासाला सुरूवात झाली. १९९२ सालापासून त्यांनी आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये मंत्रमुग्ध करून टाकणारे संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत.
रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से, लगान, रंग दे बसंती हे त्यांनी संगीत दिलेले काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. २००८ साली प्रदर्शित झालेल्या स्लमडॉग मिलेनियर या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रहमानाला यांना ऑस्कर, गोल्डन ग्लोब व बाफ्टा पुरस्कार मिळाले आहेत.