नवी दिल्ली – देशभरात सध्या करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त कऱण्यात येत आहे. त्यात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. नवीन रुग्णांची वाढ झपाट्याने होत असताना आधी करोना होऊन गेलेल्या लोकांना ओमायक्रॉनची लागण होऊ शकते, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टीकरण दिलं आहे.
यावर WHO ने म्हटलं की, याआधी करोना होऊन बऱ्या झालेल्या व्यक्तींमध्ये नैसर्गिक अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत, मात्र ओमिक्रॉन वेरिएंट या अँटीबॉडीजना भेदून शरीरात प्रवेश करू शकतो. म्हणजे, याआधी करोनाची लागण झालेल्यांनाही पुन्हा ओमिक्रॉनची लागण होऊ शकते. किंबहुना, अशा व्यक्तींना डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याचं WHO ने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान डेल्टा व्हेरियंटएवढा ऑमायक्रॉन घातक नसल्याचं WHO ने सांगितलं आहे. तसेच ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर रुग्णालयात भरती करावं लागण्याची शक्यता अगदी नगण्य असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दुसरीकडे सततचं म्युटेशन, वेगाने आणि मोठ्या प्रमाणात होणारा संसर्ग आणि रिइन्फेक्शनची शक्यता यामुळे ओमिक्रॉनही पुढे जावून घातक रुप धारण करू शकतो, अशी शक्यताही वैज्ञानिक व्यक्त करत आहेत.