मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या सूरत येथील कार्यालयात रेमडेसिव्हीर औषधांचा साठा करण्यात आला असून तेथून भाजपच्या नावावर लोकांना या औषधांचे वितरण केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना रेमडेसिव्हीर दिल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहे. यावरून रेमडिसिव्हीअर बाबत ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्ट’, अशी भूमिका नवाब मलिक यांनी घेतल्याचे दिसून येते. रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडेसिव्हीर चोरून आणले आहेत का? याबाबत नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
रेमडिसिव्हीअर बाबत “आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट”, अशी भूमिका @nawabmalikncp यांनी घेतल्याचे दिसून येते. आमदार @RRPSpeaks यांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडिसिव्हीअर चोरून आणले आहेत का? याबाबत नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण द्यावे!@BJP4Maharashtra @bjp4mumbai pic.twitter.com/aw1H4hRapY
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) April 12, 2021
दरम्यान, देशात रेमडेसिव्हीर औषधांचा तुटवडा निर्माण झालेला असताना एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात मात्र याचे साठे असल्याचे दिसून आल्यामुळे आता त्यातूनही मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या औषधांचा पुरवठा कधी सुरळीत होणार आहे यावर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी अजून कोणतेही भाष्य केलेले नाही. सध्या हे औषध देशात काळ्या बाजारात विकले जात आहे. रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन 1100 ते 1400 रूपयांना विकले जात असताना त्याची आज काळ्याबाजारातील किंमत मात्र तीन ते चार हजार रूपयांपर्यंत गेली आहे.