रेडा -माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे जवळचे नातलग, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील व त्यांचे दोन सुपुत्रांनी भाजपला रामराम करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू व भाजपचे नेते प्रशांत पाटील यांची मागील काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षामध्ये घुसमट होत होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संपर्कामध्ये माजी सभापती पाटील मागील कालावधीत अनेकवेळा आले.
पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावात व बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गट, इंदापूर तालुक्यात मोठा राजकीय परिणाम होणार आहे.
पक्ष प्रवेशावेळी सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,
तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुका उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव इजगुडे, सचिन सपकळ, रणजित घोगरे व इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवेश फक्त ट्रेलर…. पिक्चर बाकी
इंदापूर तालुक्याची जडण-घडण कॉंग्रेस विचारातून झाल्यामुळे आमची भाजपमध्ये घुसमट होत होती. माझा प्रवेश झालेला आहे. तो टेलर आहे. पिक्चर बाकी है, अशी शायरी करत इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस बलवान बनवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असा मला विश्वास आहे.
इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील यांना सामाजिक राजकीय कामाचा अत्यंत अनुभव आहे. त्यामुळे बावडा परिसरात पाटील यांचे अनेक कुटुंबांशी ऋणानुबंध असल्यामुळे इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस दमदार होण्यासाठी मदत होईल.
-प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस