चंद्रपूर – व्हॉट्सअॅपला ‘बाय बाय’ स्टेटस ठेवून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. संदीप चौधरी, वय २५ असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील मृत संदिप रहिवासी आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. संदिपने कोणत्या कारणाने आत्हमत्यात केली हे अद्याप समजू शकले नाही. पोलिस शोध घेत आहेत.
संदिपचे खडसंगी येथे स्वतःचं मिठाईचे दुकान आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी त्याने व्हॉट्सअॅप ‘बाय बाय’ स्टेटस ठेवून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. संदीपचे हे स्टेटस पाहून त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी संदीपच्या घरी धाव घेतली. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता.
२ जुलै रोजी संदीपचा २५ वा वाढदिवस होता. तसेच त्याचे लग्न सुद्धा ठरले होते. संदीपने टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण अद्याप कुटुंबीयांनाही कळू शकले नाही. त्याच्या अशा जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.