डेहराडून – उत्तराखंड मधील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत हे पक्ष संघटनेवर नाराज असल्याचे त्यांच्या एका ट्विटर संदेशावरून दिसून आले आहे. त्यांनी स्वत:च पक्ष सोडण्याचेही संकेत दिले आहेत.
त्यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे की, निवडणुकीच्या समुद्रात उडी मारताना पक्ष संघटनेकडून किंवा नेतृत्वाकडून मला सहकार्य मिळण्याऐवजी माझ्याकडेच पाठ फिरवली जात आहे. माझ्या बाबतीत नकारात्मकाच पक्षाकडून दिसून येऊ लागली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
ज्यांच्या आदेशानुसार मी या इलेक्शनच्या समुद्रात उडी मारणार आहे, त्यांचे प्रतिनिधीच माझे हात बांधत आहेत. आता मला माझा आतला आवाज सांगतो आहे की आता बास, आपण खूप पोहलो आहोत आता ही विश्रांती घेण्याची वेळ आहे असे मनोगतही त्यांनी व्यक्त केले आहे.
उत्तराखंडमध्ये पुढील वर्षाच्या सुरूवातीला विधानसभेची निवडणूक होणार आहे. नेमक्या त्याच पार्श्वभूमीवर रावत यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान कॉंग्रेसने जुन्या नेत्यांना पद्धतशीरपणे दूर करून आता नवीन नेतृत्वाकडे पक्षाची धुरा सोपण्याचा निर्णय घेतल्यानेच उत्तराखंडच्या निवडणुकीतून रावत यांना दूर ठेवण्याचे प्रयत्न केले जात असावेत असा निष्कर्ष काही राजकीय निरीक्षकांनी काढला आहे.