डेराडू- मतमोजणीच्या 24 तास अगोदरपर्यंत उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसच्या विजयाचा दावा करणारे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिश रावत हे उत्तराखंडच्या लालकुआ मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.
हरिश रावत यांचा हा पराभव कॉंग्रेससाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. या मतदारसंघात भाजपा आणि कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होती. अखेर या लढतीमध्ये हरिश रावत यांचा पराभव झाला आहे. रावत हे कॉंग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांच्या मर्जीतील नेते मानले जातात.
उत्तराखंड निवडणुकीच्या काही काळ अगोदर पक्षात आपल्याला टाळले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यांची मनधरणी करण्यात कॉंग्रेसच्या श्रेष्ठींना यश मिळाले होते. त्यानंतर रावत विशेष उत्साहाने कामाला लागले होते व राज्यात पुन्हा कॉंग्रेस सत्तेवर येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
त्याला कारण भाजप या सत्ताधारी पक्षातही आलबेल नव्हते. बड्या नेत्यांची नाराजी आणि तीन वेळा बदललेले मुख्यमंत्री यामुळे कॉंग्रेसला पुन्हा वापसीची स्वप्ने पडू लागली होती. रावत मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. पण मतदारांनी त्यांना नाकारले.