चंदीगड – पंजाबातील कॉंग्रेस नेतृत्वाचा उल्लेख पंज प्यारे असा केल्याने पंजाबातील नागरिकांनी अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस हरिष रावत यांच्यावर जोरदार टीका सुरू केली होती. त्या पार्श्वभूमीवर हरिष रावत यांनी माफी मागितली आहे. रावत हे पक्षाचे पंजाब शाखेचे निरीक्षक आहेत.
रावत हे मंगळवारी चंदीगडला आले होते. त्यावेळी त्यांनी पंजाबाचे मुख्यमंत्री व पक्षाच्या चार कार्याध्यक्षांचा उल्लेख पंज प्यारे असा केला होता. त्यातून हा वाद उद्भवला होता. शीख धर्मात पंज प्यारे हा उल्लेख पवित्र अर्थाने केला जातो. आपली ही चूक झाली असे रावत यांनी मान्य केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की कधी तरी कोणाचा सन्मान करण्यासाठी जो उल्लेख करतो त्यातून चुकाचा अर्थ जातो आणि पवित्र शब्दाचा दुरूपयोग होतो. मी मुख्यमंत्री व चार प्रदेश कार्याध्यक्षांचा सन्मान करण्यासाठी हा पंज प्यारे असा उल्लेख केला होता.
त्याचा अनर्थ होईल याची मला कल्पना आली नाही पण तरीही माझ्याकडून चूक झाली आहे त्याबद्दल मी माफी मागतो असे रावत यांनी म्हटले आहे. शीख धर्मातील पंज प्यारेची अन्य कोणाशीही तुलना करता येऊ शकत नाही याची मला जाणीव आहे, त्यामुळे माझ्या हातून जी चूक झाली व लोकांच्या भावना दुखवल्या गेल्या त्याबद्दल मला माफ करा, असे रावत यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटले आहे.