मंचर-पहिल्या लग्नासह अपत्य असल्याचे लपवून ठेवून दुसरे लग्न करूनही दारू पिऊन विवाहितेला मारहाण, शिवीगाळ आणि फसवणूक केल्याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात नवऱ्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती अनंत उर्फ आनंद म्हसू शिंदे, सासरे म्हसू शिंदे, सासू शांता म्हसू शिंदे, कविता अनंत शिंदे (सर्व रा. निमगाव जाळी, ता. संगमनेर जि. अहमदनगर), नणंद पूजा चंद्रभान रणसुर (रा. कळस, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मंचर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंचर येथे 1 सप्टेंबर 2019 ला आनंद शिंदेबरोबर पीडितेचे लग्न झाले. पती पुण्यास कामास असल्याने त्याच्यासोबत किरकटवाडी येथ राहण्यास गेली. तिथ आनंद दररोज दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण करू लागला. तर जानेवारी 2020 मध्ये पतीची बदली भोरला झाल्यावर त्याने बायकोला माहेरी पाठवले.
मात्र, 15 दिवस नवऱ्याने कुठलाही संपर्क न केल्याने सासू-सासऱ्यांकडे जाऊन चौकशी केली असता नवरा पहिल्या बायकोसोबत राहत असल्याचे समजले. याबाबत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास आश्वी पोलीस ठाणे, संगमनेर यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचे मंचर पोलिसांनी सांगितले.